झोपाळा
झोपाळ्यावर बसणे माझीच नाही तर बहूसंख्य लोकांची आवडीची गोष्ट आहे असे म्हणायला हरकत नाही. झोके घेतले की ते घेतच रहावेसे वाटतात व काही केल्या उठावेसे वाटत नाही. झोपाळ्याची अशी आगळी जादू आहे. झोपाळा म्हणजे दोन बाजूंनी टांगलेला, तीन जण बसू शकतील असा, सर्वात चांगला. हल्ली सिंगल साखळीचे, हूक लावून ग्रिलवर टांगलेले एकच व्यक्ती बसू शकेल असेही झोपाळे येतात. त्यात सुद्धा झोके घेत बसून रहावेसे वाटते. त्यांचा फायदा म्हणजे ते ३६० अंशात कसेही वळू शकतात. लहानपणी काॅलनीतल्या एका मित्राच्या घरी बाहेरच्या खोलीत असा छान झोपाळा होता. कधीही गेलो की मी त्यावरच बसत असे. कोकणात माझ्या मामाच्या घरी माजघरात असाच सुंदर झोपाळा आहे. त्यावर बसून मामा मामीशी गप्पा मारणे म्हणजे अमृतानुभव. तीन चार वर्षांपूर्वी माझ्या फॅमिलीने मला सिंगल साखळीचा झोपाळा वाढदिवसाची भेट म्हणून दिला. मला सर्वात आवडलेली गिफ्ट. मला वाटते कुठल्याही घरात तीन गोष्टी जरूर असाव्यात. पहिली एक छान बुकशेल्फ — सुंदर पुस्तकांनी भरलेली. दुसरी म्हणजे एखादे वाद्य — पेटी, गिटार, काही नाही तर निदान तानपुरा. आणि तिसरी म्हणजे झोपाळा. ...