पाऊस
आता पाऊस जरा जरा लागला आहे. आभाळ भरले आहे. रिपरिप सुरू आहे. झाडे चिंब झालीयेत. पानांतून पाण्याचे थेंब टपकतायत. खाली छोटीछोटी तळी जमू लागली आहेत. मधूनच पावसाचा जोर वाढतो. आवाज वाढतो. हाॅलमधल्या ओट्यावर बसून मी ही सगळी गंमत बघतोय. कमालीचा आळस अंगात भरलाय. घराबाहेर पडावेसे वाटत नाहीये. अंतर्मुख करणारा हा पाऊस पाहात बसून रहावेसे वाटतेय. लहानपणी शाळा व पाऊस एकाच सुमारास जून महिन्यात सुरू व्हायचे. कोणीतरी शिक्षा केल्यासारखे वाटायचे. हुरहूर वाटायची. वर्ग बदलायचा, शिक्षक बदलायचे. मग हळूहळू नवीन वातावरणात रूळायला सुरूवात व्हायची. आजही पावसाळ्यात शाळेत जाणारी मुले पाहून ते दिवस आठवतात. त्या संमिश्र भावना आठवतात. पुन्हा एकदा शिकावेसे वाटते.