Posts

Showing posts from August, 2019

कोलवा

परवाच गोव्यात आलो. एअरपोर्ट वरून कोलवा बीच जवळील रिझाॅर्टला जातानाच अगदी शांत, निवांत वाटू लागलं. ही शांती गोव्याच्या भूमीत, इथल्या हवेत व कणाकणात सामावलेली आहे असं वाटतं. रिझाॅर्टवर आमच्या रूमच्या बाल्कनीतून थोडा लांबवर समुद्र दिसतो. समुद्राची गाज स्पष्ट ऐकू येते. बाहेर पडले की दोन मिनिटात बीचवर जाता येते. आज कुठे धावपळ न करता रूमवरच राहायचे ठरवले. व्यंकटेश माडगुळकरांचे 'चित्रे आणि चरित्रे' शांत वातावरणात वाचायला खूप मजा येत आहे. त्यांचे 'बनगरवाडी' मित्राने वाचायला दिले होते. मी विशेष उत्सुक नव्हतो. मी कायम शहरात वास्तव्य केले असल्याने ग्रामीण पार्श्वभूमीचे पुस्तक मला आवडणार नाही असे समजत होतो. बनगरवाडी हातात घेतले ते संपेपर्यंत खाली ठेवले नाही. हे त्यांचे दुसरे पुस्तक वाचतोय व बहुदा त्यांची बरीचशी पुस्तके वाचल्याशीवाय चैन पडणार नाही. गोव्याला आधी बर्‍याचदा आलो आहे व बरेच फिरलो आहे. यापुढे असेच समुद्राजवळच्या रिझाॅर्टवर येऊन रहावे, बीचवर फिरावे व वाचन-लेखन करावे असे वाटू लागले आहे. रविंद्र शेणोलीकर

अ परफेक्ट मर्डर

काही दिवसांपूर्वी "अ परफेक्ट मर्डर" हे नाटक पाहिले. अल्फ्रेड हिचकाॅकचा गाजलेला चित्रपट "Dial M for murder" चे हे सुंदर नाट्यरूपांतर. पहिल्या क्षणापासून खिळवून ठेवणारे. चित्रपट खूप वर्षांपूर्वी पाहिला असला तरी पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळाला. नाटकाचे लेखन फार उत्तम झाले आहे. अनिकेत विश्वासराव व पुष्कर श्रोत्री ह्यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. विशेषत: पुष्करने पोलिस ऑफिसरची भूमिका मस्तच केली आहे. हे नाटक ते भूमिकांची अदलाबदल करून सुद्धा सादर करतात. त्यामुळे तुम्ही नाटक बघाल तेव्हा पुष्कर वेगळ्या भूमिकेत बघायला मिळण्याची शक्यता आहे. प्रिया मराठेने काम चांगले केलेय. पण जरा नवखी वाटते. कथेच्या दृष्टीने नेपथ्य फार महत्वाचे होते व ते समर्थपणे सांभाळले आहे. प्रयोग जवळजवळ हाउसफुल होता. नाटक चांगली गर्दी खेचत आहे व त्यात नवल नाही. अवश्य बघावे असे नाटक. रविंद्र शेणोलीकर