गोल्डा - एक अशांत वादळ
अमेरिकेत आपल्या कुटुंबाबरोबर वास्तव्य करणारी गोल्डा, तिचे प्रखर राष्ट्रप्रेम, त्यासाठी वाटेल तितके कष्ट घ्यायची तयारी, राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयासाठी अमेरिका सोडून मध्यपूर्वेत पॅलेस्टीनमध्ये येणे, प्रतिकूल परिस्थितींना तोंड देत राष्ट्रनिर्मितीच्या चळवळीत सामील होणे, पुरूषांच्या प्रभावळीत स्वयंतेजाने तळपणे हा सर्व प्रवास पुस्तकात वीणा गवाणकरांनी क्रमवार व कौशल्याने टिपला आहे. या बरोबरच गोल्डाचे व्यक्तीगत, कौटुंबिक जीवन, पतीशी मनाने दूर जाणे व वेगळे राहणे, तिच्या प्रकृतीच्या वारंवार त्रास देणार्या तक्रारी यांच्यावरही प्रकाश टाकायला लेखिका विसरल्या नाहीयेत. इस्रायल राष्ट्राचे निर्माते बेन गुरियाॅन यांची निष्ठावंत, उजवा हात बनून राष्ट्राची निर्मिती झाल्यावर राष्ट्र उभारणीसाठी गोल्डा वारंवार अमेरिकेला जाते, तिथल्या ज्यूंना आवाहन करून प्रचंड निधीसंकलन करून आणते, तसेच वेगवेगळ्या राष्ट्रात वसलेल्या व इस्रायलला स्थलांतर करू इच्छिणार्या ज्यूंचे स्थलांतर करण्यास मदत करून त्यांचे सुस्थापन करते. नवनिर्मित देशाच्या अनेक आघाड्यांवर ती अविरत कार्य करत राहते. श्रम व कामगार मंत्रालयाची मंत्री म्हणून कारभार सांभाळते. यथावकाश ती इस्रायलची पंतप्रधान होते. योम किपूर युद्धात इस्रायलला नेतृत्व देते. सर्व बाजूंनी अरब शत्रूंनी घेरलेल्या इस्रायलच्या सीमा सुरक्षित ठेवण्यास मदत करते. असे हे देदिप्यमान चरित्र लेखिकेने अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. त्यांची शैली ओघवती आहे. पुस्तकात देशांतर्गत व आंतरदेशीय राजकारणही उत्तम पद्धतीने मांडले आहे. दुसर्या महायुद्धातले ज्यूंचे शिरकाण, अमेरिका व इंग्लंड यांचे अरबधार्जिणे राजकारण व अरब राष्ट्रांचा इस्रायलला कडवा विरोध या बाबीसुद्धा पुस्तकात योग्य प्रकारे मांडल्या आहेत. अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे.
रवींद्र शेणोलीकर
Comments
Post a Comment