उपरती
शेवटची चढण चढून ती कड्याच्या टोकाशी येऊन उभी राहिली. खालच्या खोल दरीत तिने डोकावून पाहिले. बस्स, आता एक उडी आणि संपेल एकदाचे सर्व काही. दारूण निराशा, दु:ख, वेदना....सगळ्याला पूर्णविराम. कायमचा.
तिने मान वर करून पाहिले. अनंत निळे आकाश सर्वदूर पसरले होते. केवढी अफाट आहे ही सृष्टी! थांगच लागत नाही. अंतराळात अशा किती सृष्टी आहेत त्याची गणतीच नाही. क्षितिजापर्यंत तिची नजर जाऊन भिडली. त्या भव्यतेपुढे तिला तिचे दु:ख फार क्षुद्र वाटू लागले. अशी होते का मी? पराभव स्वीकारणारी, पळपुटी? कधीच नाही. संघर्षाला मी कधीच घाबरले नाही. मग आज इथे का आले आहे?
मंद वार्याची झुळुक अधूनमधून येऊन सुखावत होती. तिला वाटले, आपण एखाद्या गोष्टीत इतके बुडून जातो, की त्याच्या पलिकडे काही जग आहे हेच विसरायला होते. मनाचे हे घेरलेपण मोडले तर सगळं सोपं होऊन जाईल. तिची चूक तिला आता उमगली होती. त्या विस्तीर्ण भवतालाने तिला काहीतरी शिकवले होते. तिच्या चेहर्यावरचे मळभ दूर होऊन प्रसन्न स्मित झळकू लागले. आत्मविश्वासाने ती मागे वळून चालू लागली....पुन्हा एकदा.....जीवनाकडे.
Comments
Post a Comment