दुसरा वर्ग
गेल्या काही दिवसात लोकलचा प्रवास पहिल्या वर्गाने न करता दुसर्या वर्गानेच करू लागलो आहे. पास पहिल्या वर्गाचा. पण त्याचे ठराविक डबे हां हां म्हणता भरून जातात. दुसर्या वर्गाचे डबे जास्त, बसायला जागा मिळून जाते. मग पहिल्या वर्गातून उभ्याने कशाला जा. तर मला असं आढळून आलं की दुसर्या वर्गातून प्रवास करणारी माणसे पेहरावानी बरीचशी पहिल्या वर्गातल्या माणसांसारखीच आहेत. दुसर्या वर्गातली माणसे मोकळीढाकळी, हसतखेळत, गप्पा मारत प्रवास करणारी आहेत. सहसा आजकाल दुसर्या वर्गातही चौथी सीट कोणी क्लेम करत नाही. शक्य असेल तरच, नाहीतर सोडून देतात. ह्या माणसांमध्ये टाइमपास चांगला होतो, ती खूप जवळची वाटतात. त्यांच्यात माणुसकीचे दर्शन होत राहते. सायन-दादर पर्यंत उठून दुसर्याला बसायला जागा देतात. एखाद्याला उभे ठेऊन शेवटपर्यंत बसून राहात नाहीत. पहिल्या वर्गातली माणसे आढ्यताखोर, फारशी तडजोड न करणारी व स्वत:त मग्न असतात. कधीतरी होणारे भांडण सोडले तर इथे फारशी करमणूक होत नाही.