भीक
रोज घडणारा प्रसंग. सकाळी स्टेशनवर जायला रिक्षा पकडतो. स्टेशनवर रिक्षा थांबताच भिकारीण येऊन हात पसरते. कडेवर एखादे मूल असते. आपले मन ढवळून निघते. रिक्षावाल्याने परत दिलेल्या पैशातली चिल्लर पाकिटात ठेवायला उगाचच अपराधी वाटते. भीक द्यावी की देऊ नये ह्या द्विधा मन:स्थितीत आपण चालू लागतो. हे रोजचेच आहे, मग रोज भीक द्यायची का? अशाने हे अजूनच सोकावतील. सन्मानाने जगण्याचा प्रयत्नच करणार नाहीत. आपण त्याला हातभार लावल्यासारखे होईल. भीक मुळीच देता कामा नये. असे विचार मनात येत असताच त्याला काटशह देणारे विचारही मनात येतात. ह्यांची खरी अवस्था आपणास माहित आहे का? अशी भीक मागायला कोणाला आवडेल? तशीच वेळ आल्यामुळेच हे भीक मागत नसतील का? पराकोटीची गरीबी आपल्या देशात असताना अशा व्यक्तींना तात्पुरती मदत करणे आपले कर्तव्य नव्हे का?
गेले कित्येक दिवस मी निर्धारपूर्वक भीक देणे टाळत होतो. निर्णय घेतला आहे त्यावर पुन्हा विचार करायचा नाही असे ठरवलेले. तरी रोज मनात खळबळ माजणे चुकत नव्हतेच. आज का कोणास ठाउक, फार विचार केला नाही. हातातले नाणे रूपयाचे आहे का दोन रूपयाचे ते न पाहता भिकारणीच्या हातावर ठेवले. नेहमीची अपराधी भावना मनात आली नाही. बरे वाटले.
रविंद्र शेणोलीकर
Comments
Post a Comment