सायकल

सायकल सायकल चालवायला आम्हा भावंडांना माझ्या मोठ्या चुलत भावाने शिकवली. म्हणजे मी व माझी बहिण आणि चुलत भावाच्या दोन सख्या, म्हणजे माझ्या चुलत बहिणी. मे महिन्याच्या सुट्टीत मुलुंडला एका मैदानावर आम्ही सायकल चालवायला शिकलो. नंतर सायकल भाड्याने आणून राउंड मारणे सुरू झाले. पण प्रत्यक्षात वडिलांनी नवी सायकल घेऊन दिली तेव्हा पंख फुटल्यासारखं वाटलं. माझं फिरण्याचं क्षेत्र रूंदावलं होतं. सायकल घेतल्याघेतल्या मी नौपाड्याच्या काकांकडे नियमितपणे जाऊ लागलो. पूर्वी ते शक्य नव्हतं. एकदा हिंमत करून मुलुंडच्या काकांकडे गेलो. काकू चाट पडली. परतताना सांभाळून जा असं पुन्हापुन्हा सांगितलं. पण मला काहीतरी मोठं यश मिळाल्यासारखं वाटलं. नववी-दहावीत शाळेत सायकल घेऊन जायला ग्रेट वाटायचं. पुढे जुनियर काॅलेजला, म्हणजे ठाणा काॅलेजलाही मी सायकल वरून जायचो. साधारण ह्या सुमारास आमच्या मित्रांच्या वर्तुळात सायकल ट्रिपचं वार वाहू लागलं. एक दिवस तळ्याच्या कट्ट्यावर एकदम गोव्याला सायकल वरून जायचा बेत ठरला. तयारी जोमात सुरू झाली. सातजण फायनल झाले. आमच्या म्होरक्यामध्ये उत्कृष्ट नेतृत्वगुण होते. त्यानी सगळे नकाशे मिळवल...