सायकल
सायकल
सायकल चालवायला आम्हा भावंडांना माझ्या मोठ्या चुलत भावाने शिकवली. म्हणजे मी व माझी बहिण आणि चुलत भावाच्या दोन सख्या, म्हणजे माझ्या चुलत बहिणी. मे महिन्याच्या सुट्टीत मुलुंडला एका मैदानावर आम्ही सायकल चालवायला शिकलो. नंतर सायकल भाड्याने आणून राउंड मारणे सुरू झाले. पण प्रत्यक्षात वडिलांनी नवी सायकल घेऊन दिली तेव्हा पंख फुटल्यासारखं वाटलं. माझं फिरण्याचं क्षेत्र रूंदावलं होतं. सायकल घेतल्याघेतल्या मी नौपाड्याच्या काकांकडे नियमितपणे जाऊ लागलो. पूर्वी ते शक्य नव्हतं. एकदा हिंमत करून मुलुंडच्या काकांकडे गेलो. काकू चाट पडली. परतताना सांभाळून जा असं पुन्हापुन्हा सांगितलं. पण मला काहीतरी मोठं यश मिळाल्यासारखं वाटलं. नववी-दहावीत शाळेत सायकल घेऊन जायला ग्रेट वाटायचं. पुढे जुनियर काॅलेजला, म्हणजे ठाणा काॅलेजलाही मी सायकल वरून जायचो. साधारण ह्या सुमारास आमच्या मित्रांच्या वर्तुळात सायकल ट्रिपचं वार वाहू लागलं. एक दिवस तळ्याच्या कट्ट्यावर एकदम गोव्याला सायकल वरून जायचा बेत ठरला. तयारी जोमात सुरू झाली. सातजण फायनल झाले. आमच्या म्होरक्यामध्ये उत्कृष्ट नेतृत्वगुण होते. त्यानी सगळे नकाशे मिळवले, वेगवेगळ्या टप्प्यांमधली अंतरं मिळवली, त्याप्रमाणे प्लॅन ठरवला. कोकणस्थ असल्यामुळे राहण्यावर एक पैसा खर्च करायचा नाही असं त्यानी ठरवलं. आम्ही सगळी सूत्रं त्याच्याकडे सोपवली होती. कारण ह्या उठाठेवी करण्यात कुणाला रस नव्हता. जिथे आमचा मुक्काम होणार होता तिथल्या ओळखी काढायला त्याने सुरूवात केली. आम्ही तेव्हा फक्त अठरा वर्षांचे होतो. शिवाय त्याने ठाण्याच्या पोलिस कमिशनर कडून एक पत्र घेतले की हे विद्यार्थी सायकल ट्रिपसाठी गोव्याला जात आहेत, त्यांना लागेल ते सहकार्य करावे. त्या पत्रामुळे संगमेश्वरची रात्र आम्ही पोलिस चौकीत काढली. ते एकच असे ठिकाण होते जिथे आमच्या कॅप्टनला ओळख काढता आली नाही. पण अर्थात तिथेही राहण्यासाठी आम्ही पैसे खर्च केले नाहीत. कोकणातल्या घाटांनी, चढउतारांनी आमची चांगलीच दमछाक केली. पण पाचव्या दिवशी आम्ही गोवा गाठला व त्या उन्मादात आम्ही सरळ कळंगुटला बीचवर जाऊन धमाल केली. गोव्यात राहायची व्यवस्था आमच्या कॅप्टनने कुठे केली असेल? त्याने मंगेशी देवस्थानच्या पुजार्याची ओळख काढली होती. देवस्थानच्या आवारातच एका बाजूला त्यांचं घर होतं. आम्ही ओसरीत सायकली लावल्या आणि ठरवलं की पाच दिवस सायकलला हात लावायचा नाही. तिथे संध्याकाळी देवळाच्या आवारात येऊन बसायला छान वाटायचं. दर्शनाला येणार्या लोकांची ये-जा असायची. देवळातून घंटानाद ऐकू यायचा. पाच दिवस गोव्यात राहून,भटकून आम्ही परत निघालो. परतीचा प्रवास घाटावरून करायचा होता. पहिल्या दिवशी फोंडा घाटातून चढून आम्ही बेळगावला आलो. नोव्हेंबरचा महिना होता. मस्त थंडी पडली होती. बेळगावच्या अभियांत्रिकी काॅलेजच्या हाॅस्टेलमध्ये आमच्या कप्तानाने ओळख काढल्यामुळे आम्ही हाॅस्टेलमधे राहायला गेलो आणि काय सांगावे. आम्हाला अक्षरश: सेलिब्रिटी सारखी ट्रीटमेंट मिळत होती. आमच्या सायकल ट्रिपने तिथली मुलं वेडी झाली होती व आम्हाला हजार प्रश्न विचारत होती. त्या हाॅस्टेलमधली सर्व तरूणांची एनर्जी, ते थंड वातावरण, बेळगावने आम्हाला जिंकलं. तिथून पाय निघत नव्हता. अखेर तिथून कोल्हापूर, सातारा, देहू रोड - कारण तिथेही कोणाच्या नातलगांकडे राहायची सोय केली होती - असं करत आम्ही बरोबर पंधराव्या दिवशी ठाण्यात परत आलो - अनेक अविस्मरणीय आठवणी घेऊन. १९८२ साली पंधरा दिवसांच्या ट्रिपचा प्रत्येकी खर्च झाला होता रू.३५०/- थँक्स टू कोकणस्थ कॅप्टन. सातपैकी सहाजण अजूनही संपर्कात आहोत, भेटत असतो आणि भेटलो की ट्रिपचा विषय निघतोच निघतो.
रवींद्र शेणोलीकर
रवींद्र शेणोलीकर
Comments
Post a Comment