मराठी सिनेमा

 माझ्या आठवणीतले जुने आवडते ब्लॅक ॲंड व्हाइट काळातले मराठी चित्रपट म्हणजे ज्याला बाबूजींचे संगीत, गीतकार गदिमा, राजा परांजपे, राजा गोसावी वगैरे अभिनेते मंडळी ज्यात असत ते. रमेश देव सीमा जोडी असलेले चित्रपटही आवडायचे. रमेश देव काळाच्या खूप पुढे वाटायचा. जरासुद्धा अवघडलेपणा त्याच्या हालचालीत जाणवत नसे. नेहमी हसतमुख व स्टायलिश. विनोदी कलाकारांत राजा गोसावी, शरद तळवलकर खूप आवडायचे. हिरोंमध्ये अरूण सरनाईक सारखा देखणा व रूबाबदार नट दुसरा कोणी नव्हता. फार प्रतिभावान संगीतकार व गायक गायिका मराठी सिनेमास चार चाँद लावत. वसंत पवार, बाबूजी, लता, आशा, सुमन कल्याणपूर सगळेच मोठे प्रतिभावंत. जयश्री गडकर ही अतिशय देखणी अभिनेत्री मराठी सिनेमात होती. पण मला तमाशा प्रधान चित्रपट मात्र फारसे आवडत नसत. मराठी चित्रपट ह्यातून कधी बाहेर पडणार आहे असं वाटे. जरी उत्तमोत्तम लावण्या लिहिल्या, गायल्या गेल्या तरी तमाशा प्रधान चित्रपट वाॅज नाॅट माय कप ऑफ टी.

नंतरच्या काळात पाहिलेला व मनावर प्रचंड परिणाम केलेला सिनेमा म्हणजे पिंजरा. डाॅ. श्रीराम लागूंचा मी बहुधा तेव्हापासूनच फॅन झालो. निळू फुले ह्या प्रचंड ताकदीच्या अभिनेत्याने मनावर पकड घेतली. अरूण साधूंच्या दोन कादंबर्‍यांवर आधारित सिंहासन हा उत्कृष्ट चित्रपट बनवण्यात आला. त्यात तर सगळे दिग्गज कलाकार होते. डाॅ. लागू, अरूण सरनाइक, दत्ता भट असे अनेक. मराठी सिनेमा नवी वळणे घेऊ लागला होता, प्रयोगशील होऊ लागला होता. ह्याच सुमारास सचिन-सुप्रिया जोडीचे काही धमाल चित्रपट आले, अशोक सराफ नावाचा जबरदस्त अष्टपैलू अभिनेता मराठी सिनेसृष्टीच्या प्रांगणात अवतरला, लक्ष्मीकांत बेरडेनी विनोदाच्या प्रांतात एक वेगळीच ढब आणली, निवेदिता, वर्षा उसगावकर, मृणाल देव, सुधीर जोशी, प्रशांत दामले, निर्माती व दिग्दर्शक स्मिता तळवलकर, सुहास जोशी, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी असे असंख्य प्रतिभावान कलाकार मराठी सिनेमाला मिळाले. त्याच बरोबर अतिशय वेगळा, सामाजिक, आशयघन चित्रपट बनवणार्‍या दिग्दर्शिका सुमित्रा भावेंनी मराठी सिनेमात एक नवीन ट्रेंड सुरू केला.

मराठी सिनेमा अजूनही तिकिटबारीवर फार यशस्वी होत नव्हता. पण दुनियादारी व सैराट ह्या चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर मराठी सिनेमावर अखेर लक्ष्मी प्रसन्न झाली आहे व मराठी कलाकार आता सधनही होऊ लागलेत. ह्यामुळे बरेच अमराठी निर्मातेही मराठीकडे वळू लागले आहेत व मराठी चित्रपट काढत आहेत. आपण आता आशा करू की मराठी सिनेमाची भरभराट अशीच चालू राहील व बाॅलीवूडचे वलयही त्यापुढे फिके पडेल. नवनवीन विषयांवर उत्तम चित्रपट मराठी सिनेमा सादर करेल व मराठी चित्रपटसृष्टीस गौरवशाली उंचीवर नेऊन ठेवेल.


रवींद्र शेणोलीकर



Comments

Popular posts from this blog

A visit to Madam Bedi

It ends with us

Chhava