आश्रम
आश्रम
ह्या वेब सीरीजचा पहिला सीझन नुकताच पाहिला. दुसरा सीझन यायचा आहे.
बाबा निराला नामक एका ढोंगी, भ्रष्टाचारी बाबाची ही कथा आहे. अंधश्रद्धा, भोळसटपणा ह्यांचे भांडवल करून लोकांना फसवणार्या, नादी लावणार्या बाबाची भूमिका बाॅबी देओलने फार छान केली आहे. ह्या बाबाचे लाखो भक्त व त्यातून त्याला मिळालेली पाॅवर, राजकीय हितसंबंध, बेकायदेशीर धंदे, खून, बलात्कार, शोषण अशा सर्व गोष्टींमुळे ही सीरीज रंगत जाते. मागासवर्गीय म्हणून होणारा अन्याय सहन न होऊन कुस्ती खेळण्यात तरबेज असलेली पम्मी आश्रमात राहायला येते. बाबाच्या बाह्य दर्शनाने प्रभावित होऊन ती बाबाची निस्सीम भक्त होते व साध्वी होऊन समाजसेवा करण्याचा निर्णय घेते. आदिती पोहनकरने ही भूमिका फार छान वठवली आहे. पम्मीचा भाऊ सत्तीची भूमिका राहुल पांडेने केली आहे जो छिचोरे चित्रपटात यापुर्वी दिसला आहे. त्याच्या पत्नीची भूमिका त्रिधा चौधरीने केली आहे. बाबाच्या गुन्ह्यांचा तपास करणार्या तडफदार पोलिस अधिकार्याची भूमिका दर्शन कुमार ह्याने तर त्याला साथ देणार्या डाॅ. नताशाची भूमिका अनुप्रिया गोएंका हिने केली आहे. अनुप्रिया बाॅलिवुडच्या काही चित्रपटात आपल्याला याआधी दिसली आहे.
सीझन वनचा शेवट येईपर्यंत आपल्या मनात ह्या बाबाबद्दल प्रचंड राग व तिरस्कार निर्माण होतो व सीझन २ मध्ये बाबाला चांगली अद्दल घडवली जाईल अशी आपण अपेक्षा करू लागतो.
रवींद्र शेणोलीकर
Comments
Post a Comment