बीकेसी
गेले दोन दिवस बांद्रा-कुर्ला काॅम्प्लेक्समधे ट्रेनींगसाठी जातोय. कुर्ल्यापर्यंत लोकल व पुढे शेअर रिक्शा घेऊन जावे लागते. रिक्शासाठी मोठी रांग असते. पण पोलिसांच्या उपस्थितीमुळे सर्व शिस्तित चालले होते. दहा मिनिटात रिक्शा मिळाली. स्टेशनबाहेरील छोट्याछोट्या गल्ल्यांतून वाट काढत पंधरा वीस मिनिटात तीस रूपये देऊन मी इप्सित स्थळी पोहोचलो.
दुपारी एका सहकार्याच्या ॲक्टिव्हावर बसून आजूबाजूच्या भागात फिरलो. त्याचे बँकेत काही काम होते. बीकेसीतल्या मोठमोठ्या ऑफिस इमारती पाहून डोळे दिपले. ह्या भागात रोज लाखो लोक कामासाठी येतात. त्यांचे अतोनात हाल होतात. पश्चिमेला बांद्र्याहून तर पूर्वेला कुर्ल्यावरून शेअर रिक्शा किंवा बसने प्रवास करावा लागतो. इथे मेट्रोचे जाळे असणे फार जरूरीचे आहे. इतक्या वर्षात ह्या भागात एवढ्या ऑफिस बिल्डिंग्ज होऊनही सामान्य लोकांसाठी काही सुविधा निर्माण करावेसे कोणाला वाटले नाही ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.
संध्याकाळी पुन्हा शेअर रिक्शा. गुरूवारी कुर्ला स्टेशनबाहेर बाजार भरतो. तुफान गर्दी रस्त्यावर. शेवटी रिक्शा स्टेशनपासून काही अंतरावरच सोडली व त्या जनसागरातून वाट काढत काढत रेल्वे स्टेशनवर पोहोचलो.
Comments
Post a Comment