कोसला
'कोसला' ही भालचंद्र नेमाडेंची सुप्रसिद्ध कादंबरी नुकतीच वाचून पूर्ण केली. मला वाटत होतं कादंबरी खूप गंभीर वगैरे असेल. पण वाचायला सुरूवात केली आणि लेखनाच्या प्रवाही शैलीत कधी वाहात सुटलो कळलंच नाही. पंचवीस वर्षाच्या महाविद्यालयीन युवकाचे हाॅस्टेल व काॅलेज जीवनाचे चित्रण कादंबरीत रंगवले आहे. तो एका खेड्यातून शहरात शिकायला आला आहे. तीन चार वर्षांच्या काॅलेज जीवनातील त्याचा संघर्ष, त्याचे उपद्व्याप, त्याने जमवलेले मित्र, परिक्षा, अभ्यास, जागरण अशा अनेक गोष्टी कथेच्या अनुषंगाने येतात. विचारांची तारूण्यसुलभ बंडखोरी, जुन्याचा तिरस्कार, नव्याचे आकर्षण वगैरे वाचताना आपला काळ आठवल्याशिवाय राहात नाही.
मात्र ही कादंबरी एवढी का गाजली ते मला कळेना. १९६३ सालची कादंबरी आहे. मला वाटतं त्या काळाचा विचार करता ती खूपच निर्भीड, प्रांजळ व बंडखोर असल्यामुळे तेव्हाच्या तरूणाईत ती लोकप्रिय झाली असावी. ह्या कादंबरीला अनेक पुरस्कार मिळाले व ती अनेक भाषांत रूपांतरीत झाली.
शेवटी मी माझ्या एका सुविद्य व साहित्यात चांगला रस व रूची असलेल्या मित्राला त्याचे मत विचारले. तो म्हणाला की एखाद्या विशिष्ट वयाच्या मुलाला कादंबरी आवडेलही पण त्यात शाश्वत असे काही आढळत नाही. मला त्याचे म्हणणे बर्याच अंशी पटले.
Comments
Post a Comment